मावळ – तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कामशेतच्या माऊलीनगर भागात दोन दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.यासंदर्भात कामशेत ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
कामशेत शहरातील काही भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.पंधरा दिवसांत दोन वेळा पाण्याची मोटार बिघडत आहे.त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिलांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.उन्हाळ्यात तर कामशेत शहरात १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात होता.यावर्षी पुरेसा पाऊस झाल्यानंतरही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.त्यामुळे महिलांना २ ते ३ किमीवरुन पाणी आणावे लागत आहे. तक्रारींकडे पंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी दररोज नियमितपणे पाणी येत आहे,तर काही ठिकाणी पाच-पाच दिवस पाणीच येत नाही,अशी परिस्थिती कामशेतमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणी विकत घ्यावे लागत आहे.