बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटनांचे सत्र थांबलेले नाही. बीडमध्ये आंदोलने, बंद, हत्या, गोळीबाराच्या घटना घडतच असून आज संतोष देशमुख हत्येमुळे चर्चेत आलेल्या आवादा एनर्जी कंपनीच्या एका कामगाराचा मृतदेह केजमधील रस्त्यावर आढळल्याने खळबळ उडाली. या कामगाराच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण ही कंपनी वाल्मिक कराड आरोपी असलेल्या खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे याकडे संशयाने पाहिले जात आहे.
रचपाल हमीद मसीह असे या मृत कामगाराचे नाव आहे. तो पंजाबच्या गुरुदासपूर येथील रहिवासी होता. आज सकाळी त्याचा मृतदेह केज शहरातील अंबाजोगाई रोडवर असणार्या चांदणी बारपुढे रस्त्यावर पडलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या कामगाराचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
याच आवादा कंपनीच्या बाबतीतील एक धक्कादायक खुलासा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सीआयडी चौकशीतून झाला आहे. दोन कोटींच्या खंडणीसाठी कंपनीचे प्रोजेक्ट हेड सुनील शिंदे यांचेही 28 मे 2024 रोजी अपहरण झाले होते, असे या चौकशीतून कळले आहे. रमेश घुले आणि त्याच्या 12 साथीदारांनी मस्साजोग येथून हे अपहरण केले होते. या प्रकरणाच्या एफआयआरमधील माहितीनुसार, सुनील शिंदे त्यांच्या साथीदारांसह केज गेस्ट हाऊसमध्ये जेवायला जात असताना एका गाडीने त्यांच्या गाडीला थांबवले. त्या गाडीतून काही लोक उतरले आणि त्यांनी गावठी कट्टा दाखवत सुनील शिंदे यांना दुसर्या गाडीत बसवून नेले. ते शिंदे यांना एका हॉटेलमध्ये घेऊन गेले.
तिथे आरोपींनी त्या हॉटेलचे शटर बंद करून पवनचक्कीच्या संदर्भातील रस्ते आणि इतर कामे आम्हाला दिली नाहीत तर महाग पडेल, अशी धमकी शिंदेंना दिली. याशिवाय जमीन अधिग्रहणासाठी दोन कोटी रुपये खंडणी द्यावी लागेल, असेही रमेश घुले आणि त्यांच्या साथीदारांनी धमकावले होते. याप्रकरणी रमेश घुलेसह त्याच्या 12 साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु, या प्रकरणात रमेश घुलेवर काही कारवाई झाली नव्हती. त्यावेळी या प्रकरणात कडक कारवाई केली असती, तर संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. त्यांचा जीव वाचला असता, असे म्हटले जात आहे. या खंडणी प्रकरणाचीही आता चौकशी सुरू आहे. दरम्यान, सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणार्या सीआयडी पथकातील उपअधीक्षक अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्याऐवजी पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहेत. या प्रकरणातील एसआयटीमधील काही अधिकार्यांच्या बदल्याही अशाच तडकाफडकी करण्यात आल्या होत्या.
या घटनांमुळे बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघत असतानाच गेल्या 24 तासांत बीड जिल्ह्यात हत्या आणि गोळीबाराची एकेक घटना घडली. आंबेजोगाईतील मोरेवाडी परिसरात आज दुपारी गणेश चव्हाण याने माऊली नगरमध्ये राहत असलेल्या सिद्धेश्वर कदम याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने कदमना इजा झाली नाही. गोळीबार करून आरोपी फरार झाला आहे. आंबेजोगाई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपासून गणेश चव्हाण हा कौटुंबिक वादातून सिद्धेश्वर कदमच्या पत्नीला धमकी देत होता. गणेश चव्हाण याच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात सिद्धेश्वरने तक्रार दिली होती. आज सकाळी गणेश त्यांच्या घरी आला. त्यानंतर दोघांत वाद झाला. गणेश चव्हाणने सिद्धेश्वरच्या दिशेने
गोळीबार केला. आष्टी तालुक्यातही हिंसक घटना घडली. काल रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आष्टी तालुक्यातील वाहिर्या गावाच्या परिसरात दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात झाली. या हल्ल्यात तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अहिल्यानगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंभोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, सात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आष्टी तालुक्यातील हातोळण येथील तिघे भाऊ काल वाहिरा येथे आले होते. दुपारी त्यांचा काही लोकांशी वाद झाला होता. त्यानंतर रात्री यातील काहीजणांनी या तिन्ही भावांवर लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अजय भोसले, भरत भोसले या दोन भावांचा मृत्यू झाला. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी झाला. हे हत्याकांड नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दिंडोरी आश्रमात कराडला आश्रय
तृप्ती देसाईंचा आरोप
भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी संतोष देखमुख हत्या प्रकरणाच्या बाबतीत एक गौप्यस्फोट केला. या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडला दिंडोरीत स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्रात कोणी आश्रय दिला? या आश्रमाचे प्रमुख अण्णा मोरे हे दुसरे आसाराम बापू आहेत. त्यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, असे आरोप त्यांनी केले.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दिंडोरीतील सेवा केंद्रात विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होते. 17 डिसेंबरला ते त्या आश्रमातून गेले होते. त्यांना कोणी आश्रय दिला? त्यांना या ठिकाणी का ठेवण्यात आले? जर त्यांनी या दोघांना आश्रय दिला असेल तर सेवा केंद्राच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दिंडोरीतील या आश्रमात 2023 मध्ये काही चुकीचे प्रकार घडत होते. त्याबाबत जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती. या बैठकीला आण्णासाहेब मोरे यांचे पुत्र चंद्रकांत मोरे उपस्थित होते. यावेळी वाल्मिक कराडने मध्यस्थी केल्याने त्याचे हेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात आश्रय दिला असावा. आश्रमाचे प्रमुख अण्णा मोरे हे दुसरे आसाराम बापू आहेत. अण्णा मोरे यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. आतापर्यंत 3 महिलांनी माझ्याकडे याबाबत लेखी तक्रार दिली. या संदर्भात माझ्याकडे आणखी पुरावे आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहे.
तृप्ती देसाई यांच्या आरोपांवर अण्णा मोरे यांचा मुलगा चंद्रकांत मोरे (आबासाहेब मोरे) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तृप्ती देसाई यांनी जो कालावधी सांगितला त्या काळात येथे दत्त जयंती सप्ताह होता. त्यावेळी अनेक भाविक या ठिकाणी येतात. तसे ते आले होते. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचा या ठिकाणी मुक्काम नव्हता. दरबारात मुक्कामाची व्यवस्था नाही. सीआयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले. वाल्मिक कराड 16 डिसेंबरला दर्शनासाठी आले आणि निघून गेले, हे त्यात दिसले.