पुणे-जिल्ह्यातील हडपसर – सासवड मार्गावरील कानिफनाथ गड डोंगर माथा ते होळकरवाडीकडे जाणार्या रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे आढळले आहे. सोमवारी रात्री काही नागरिकांना या बिबट्याचे दर्शन घडले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कानिफनाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या मार्गाचा वापर करतात. गुरुवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमा, शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी गडावर दर्शनासाठी ये -जा करणार्या भाविकांची संख्या अधिक असते. खास करून पहाटे या परिसरात फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोपगाव परिसरातील रसवंती,हॉटेल व्यावसायिक, कामगार, कानिफनाथ गडावरुन पलीकडील भागातील हांडेवाडी,हडपसर तसेच उंड्री पिसोळी भागात व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करत असतात.त्यामुळे वनविभागाने वेळीच दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.