कानपुरच्या बाजारात भीषण आग;
५०० कपड्यांची दुकाने भस्मसात

कानपुर – कानपूरमधील बनसमंडी येथे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. येथील हमराज बाजाराजवळील एआर इमारतीला आग लागली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीत ५०० हून अधिक कपड्यांची दुकाने जळून खाक झाली असून सुमारे १० करोड पेक्षा जास्तचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी सहा तास अथक प्रयत्न केले.

कानपूरमधील बनसमंडी येथील हमराज ही यूपीमधील सर्वात मोठी तयार कपड्यांची घाऊक बाजारपेठ आहे. येथील इमारतीमध्ये ही कपड्यांची घाऊक दुकाने आहेत. येथे रात्रीच्या वेळी अचानक आग लागली. ही आग हळूहळू संपूर्ण इमारतीत पसरत गेली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते. कानपूर, उन्नाव आणि लखनौसह अनेक जिल्ह्यांतील अग्निशमन दलाच्या ५० हून अधिक गाड्या आग विझवण्यास दाखल झाल्या.

या घटनेनंतर कानपूरचे आयुक्त घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवण्यासाठी लष्कराच्या गाड्याही बोलावल्या. अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीच्या कारणाचा सविस्तर तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Scroll to Top