मुंबई- राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाच्या जागेत बदल केला आहे. हे महाविद्यालय मौजे सांगाव ऐवजी त्याच तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे उभारले जाणार आहे. त्यासाठी जमीन निःशुल्क उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. मंत्री परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.
कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित ५० रूग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास ४ ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तथापि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग, नवी दिल्ली यांच्या मानंकानुसार मौजे सांगाव येथे या होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी पुरेशी, सलग व सुयोग्य जागा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील गट क्र.४८७ मधील गायरान जमीनीपैकी ५.७५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यास काल झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही जमीन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.