मुंबई- देशातील अनेक शहरात व विशेषत्वाने दिल्ली व मुंबईत कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असून कांदा किलोमागे ८० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. देशात गेल्या काही दिवसांमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असून त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदील झाली आहे.
कांद्याच्या घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या बाजारात कांद्यांची आवक होत नाही. बाजारात जो कांदा आहे तो कांदा व्यापाऱ्यांकडील आहे. त्यामुळे व्यापारी आपल्याकडील कांदा बाजारात आणून मोठा नफा मिळवत असल्याचे नाशिकमधील काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत नवीन लाल कांदा बाजारात आल्यावर हे दर काहीसे आटोक्यात येतील. तो पर्यंत लोकांना कांद्याला अधिक दर द्यावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांमधील केंद्र सरकारचे कांदा आयात निर्यात व खरेदीचे धोरणही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याचे न राहिल्यानेही ही वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे दर कमी होण्यासाठी महिना संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. कांद्याच्या दराबरोबरच लसूण आता गगनाला भिडला असून काही ठिकाणी तो पाचशे रुपये किलोच्या पुढे गेला आहे. तेल, डाळी व इतर जीवनावश्यक दरातील मोठी वाढही सर्वसाधारण व्यक्तींसाठी त्रासदायक ठरत आहे.