नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्याची अट काढून टाकली आहे, तर निर्यातशुल्कात ५० टक्के कपात केली आहे. आज वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात नोटीफिकेशन जारी केले आहे.केंद्राच्या या निर्णयाने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता किमान ५५० डॉलर प्रति टन कांदा निर्यात मूल्याची अट काढून टाकली असून कांदा निर्यातदारांना हव्या त्या किंमतीत कांदा निर्यातीची मुभा देण्यात आली आहे. दुसरीकडे निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याची अट टाकण्यात आली होती, तीही शिथिल करण्यात आली असून आता केवळ २० टक्के निर्यात शुल्क कांदा निर्यातदारांना द्यावे लागेल,
कांद्यावरील निर्यातीचे नियम शिथील केल्याने बाजारात नवीन येणाऱ्या कांद्याची निर्यात करणे सोपे होऊन दिवाळीनंतरही नवीन लाल आणि रांगडा कांदा बाजारात आल्यावर शेतकऱ्यांचे कांदा बाजारभाव काहीसे टिकून राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आला, तरी निर्यातीवरील निर्बंध काहीसे शिथिल झाल्याने नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे भाव चांगले राहतील असा अंदाज लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.