मुंबई
कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबार करुन आरोपी पसार झाल्याची घटना आज सकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली. या गोळीबारमध्ये 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा गोळीबार नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
आज सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी लालजी पाडा परिसरात अचानक एका व्यक्तीने गोळीबार करायला सुरुवात केली. त्यावेळी नागरिकांमध्ये जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ उडाली. या गोळीबारात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृत तरुण या परिसरात टँकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, 1 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती.तब्बल चार राऊंड फायरिंग झाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते. बाईकवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून गोळीबार करण्यात आला होता.
कांदिवलीमध्ये गोळीबार तरुणाचा जागीच मृत्यू
