मुंबर्ई- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी म्हणून पंतप्रधान बीकेसीच्या जिओ वर्ल्ड येथे आल्यावर काँग्रेसकडून आज बीकेसी येथे ‘पंतप्रधान माफी मांगो’ आंदोलन करण्यात येणार होते. त्यासाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र पोलिसांनी आज सकाळीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातून उचलून ताब्यात घेतले आणि सर्व काँग्रेस नेत्यांना घरात डांबून ठेवले. त्यांना घराबाहेर पडू दिले नाही. अशी कारवाई गेली अनेक दशके पाहिली नव्हती .
पोलिसांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान, अस्लम शेख, गणेश यादव या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना त्यांच्या घरात डांबून ठेवले. नेता घराबाहेर पडताच त्याला ताब्यात घेऊन पोलीस गाडीत घेतले जात होते. खासदार वर्षा गायकवाड यांना त्यांच्या बांद्रा येथील घरामध्ये स्थानबद्ध करण्यात आले. त्यांच्या घराबाहेर सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्या इमारतीकडे येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. त्यांची बहीण ज्योती गायकवाड यांनाही इमारतीमध्ये जाण्यापासून अडवण्यात आले. इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही अडवण्यात आले. याच्या निषेधार्थ वर्षा गायकवाड, सचिन सावंत आक्रमक झाले. आमच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचे सांगत त्यांनी इमारतीखाली ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी महिला पोलिसांनी वर्षा गायकवाड यांच्याभोवती अक्षरशः गराडा घातला होता. पोलीस त्यांना कुठेही जाऊ देत नव्हते. अखेर वर्षा गायकवाड यांनी शिवाजी पार्कला जाऊ द्या, अशी विनंती केल्यावर त्यांना पोलीस गाडीतून शिवाजी पार्कला सोडण्यात आले. तिथे त्यांनी काही काळ आंदोलन केले.
आमदार भाई जगताप काळे कपडे घालून आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या घरी पोलीस पोहोचले आणि त्यांना पोलीस गाडीत घालून पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस नेते नसीम खान यांच्या घरी पोलीस गेले होते. साकीनाका जरीमरी येथील त्यांच्या निवासस्थानी मोठा फौजफाटा घेऊन पोलीस दाखल झाले होते. आमदार अस्लम शेख, गणेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आमचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. महाराजांच्या प्रती असलेल्या अस्मितेखातर व्यक्त होणे हा गुन्हा आहे का? आज आम्हाला रोष व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे, हे नक्कीच शिवरायांचे राज्य नाही.
आमच्या कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतले जात आहे? माझ्या राहत्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला. घडलेल्या घटनेचा आम्ही पंतप्रधानांना जाब विचारू नये का? ज्यांनी पुतळ्याची रचना केली आणि ज्यांनी पुतळा उभारला त्या दोषींना मोकळे सोडून दिले जाते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबून ठेवले जाते.