मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, दोन्हींमधील पक्ष आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने 20 ऑक्टोबरला यादी जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे, तर महायुतीची यादीही 48 तासांत जाहीर होणार आहे. भाजपाची पहिली यादी उद्याच जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीकडून जवळपास 240 जागांचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीकडून 216 जागा निश्चित करण्यात आल्याचीही माहिती आहे. या निवडणुकीत भाजपाकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा असल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आज म्हणाले की, महाविकास आघाडीचे 216 जागांवरील वाटप ठरले असून, त्यात काँग्रेसला 84 जागा मिळणार आहेत. उर्वरित जागांवर चर्चा सुरू आहे. काँग्रेसने जाहीर केले की, 20 ऑक्टोबरला आपली पहिली यादी जाहीर होईल. आज जागावाटप पूर्ण झाले, तर त्या दिवशी आमची अंतिम यादीही जाहीर होऊ शकेल. मुंबईतील जागावाटप निश्चित झाले आहे. इतर छोट्या पक्षांनाही आम्ही बरोबर घेतले आहे. समाजवादी पक्षाशी चर्चा सुरू आहे. त्यांनी काही जागा मागितल्या आहेत. आमचे पान 1 वरून
जागावाटप ठरले की, कुणाच्या कोट्यातून त्यांना जागा द्यायच्या हेही ठरेल.
महायुतीचे जागावाटपही जवळजवळ निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. भाजपा 138, शिंदे शिवसेना 85 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 65 असा फॉर्म्युला ठरल्याचे कळते. 2019 मध्ये भाजपा आणि एकसंध शिवसेना यांची युती असताना भाजपाने 164, तर शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजपाने नमते घेऊन मित्रपक्षांना जास्त जागा दिल्या आहेत. हा फॉर्म्युला ठरल्याने आता महायुतीच्या काही उमेदवारांना येत्या 48 तासांत एबी फॉर्म दिले जाणार आहेत. भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. त्यात 100 नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
काल संध्याकाळी दिल्लीत भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या विद्यमान 105 आमदारांच्या मतदारसंघांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय भाजपाला समर्थन देणाऱ्या 11 अपक्षांच्या मतदारसंघांवरही चर्चा झाली. भाजपाकडून यंदा मुंबईत काही विद्यमान उमेदवारांना तिकीट नाकारले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यात घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम, वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, सायनचे कॅप्टन तमिल सेल्वन, बोरिवली पश्चिमचे सुनील राणे, घाटकोपर पूर्वचे पराग शहा यांच्या नावाचा समावेश आहे. राम कदम यांना सुमार कामगिरीचे कारण देत यंदा उमेदवारी नाकारली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते. राम कदम हे 2014 आणि 2029 असे दोन वेळा भाजपाकडून सहजपणे निवडून आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी चांगली नसल्यामुळे आणि त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे भाजपा नेतृत्वाकडून त्यांचा पत्ता कट केला जाईल असे सांगण्यात येत आहे. राम कदम यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यास घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आहे.
वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पांडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते. तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापले होते. मुंबईतील एका बड्या नेत्याने गोपाळ शेट्टींसाठी आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे, गोपाळ शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही सुरू केली आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, नवी मुंबईतून मंदा म्हात्रे, ठाण्यातून विनय सहस्रबुद्धे यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात आली आहे.