काँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्ससह जम्मू काश्मीरमध्ये युती

श्रीनगर – जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात युतीची घोषणा आज करण्यात आली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी या युतीची घोषणा केली असून काँग्रेसनेही आपल्या एक्स अकाऊंटवर विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स इंडीया आघाडी बरोबर होते. तरीही जम्मू काश्मीरच्या जागांवरुन त्यांच्यात फार सख्य नव्हते .विधानसभा निवडणुकीत ही युती होईल की नाही याची शाश्वती नव्हती. काँग्रेस नेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज अध्यक्ष फारुख अब्दुल्ला व उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. त्यानंतर या युतीची घोषणा करण्यात आली. काँग्रेस मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी बरोबरही चर्चा करण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या पुढाकाराने हे शक्य होऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी स्थानिक स्तरावर नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी मध्ये एकमत होईल का यावर चर्चा सुरु आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते राहुल गांधी कालपासून काश्मीरच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी श्रीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देवून लोकशाही अधिकार परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे पहिल्यांदा झाले आहे की एखाद्या राज्याचा केंद्रशासित प्रदेश केला. जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा मिळवून देण्याला आमचे प्राधान्य असेल. या भागात शांतता व बंधुभाव अबाधित राहावा यासाठी या भागात आमचे मुहब्बत की दुकान स्थापणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले की, उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे इथे निवडणूक होत आहे. भाजपाने व मोदींनी हे समजून घेतले पाहिजे की लोकांना अधिक काळ दाबून ठेवता येणार नाही. आम्ही काश्मीरच्या जन जंगल व जमीन साठी लढणारे आहोत. ते हिसकावणारे आहेत. आज खोऱ्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. इथे लाखो पदे रिक्त आहेत. जी काही भरती होत आहे ती केवळ कंत्राटी पद्धतीनेच होते. या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊन शांतता प्रस्थापित करण्यावर आमचा भर असेल. त्यासाठी येथील विविध पक्षांबरोबर आम्ही चर्चा करणार आहोत. केंद्रात इंडीया आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठे यश मिळवले. केंद्राला आता भाजपाला मनमानी करता येणार नाही अशी स्थिती निर्माण करणे हेच आमचे फार मोठे यश आहे.
राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे कालपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल श्रीनगरच्या एका हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण घेतले तर लाल चौकात आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. राहुल गांधी हे नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीसह एकत्र येऊन एक मजबूत आघाडी उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स कडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पीडीपी बरोबर त्यांच्या वाटाघाटी यशस्वी होतात का हे पाहावे लागणार आहे. नॅशनल काॅन्फरन्सचा पीडीपी सोबत जाण्यास विरोध आहे . भाजपा जम्मूत एकला चालोरेच्या विचारात आहे तर काश्मीरमध्ये काही स्थानिक पक्षांना सोबत घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top