नाशिक – येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर पिकाच्या शेतावर नांगर फिरवला.पिकाला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने या शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या पिकावर नांगर फिरवला तर दुसऱ्या शेतकऱ्याने मेथीच्या पिकामध्ये जनावरे सोडून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
नाशिक जिल्ह्यातील किरकोळ बाजारात बुधवारी मेथीला १० ते १५ रुपये जुडी तर कोथिंबिरीला २ ते १५ रुपये जुडी असा दर मिळाला.त्यामुळे कोथिंबिर विक्रेते शेतकरी संतप्त झाले होते.राजेंद्र देवराम वाघ नावाच्या शेतकर्याने कोथिंबीर लागवड केली होती.ती काढणीस आली व बाजारात कवडीमोल भावाने विक्री झाली.यामुळे त्यांचा संताप अनावर झाला.वाघ यांनी मनमाड बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी नेली असता, तेथे त्यांना कमी दर मिळाला.त्यामुळे त्यांनी कोथिंबिरीच्या शेतात नांगर फिरवला.खर्चाचा मेळ बसत नसल्याने त्यांनी पीकच नष्ट केले आहे.तसेच शेतकरी सुदाम पुंडलिक वाघ यांनी मेथीची लागवड केली होती. मात्र, मेथीला खूपच कमी दर मिळत असल्याने त्यांनी मेथीच्या पिकात जनावरे सोडली आहेत. नफा मिळत नसल्याने निराश राजेंद्र वाघ व सुदाम वाघ यांनी अशाप्रकारे पीकच नष्ट केले आहे.