कवठे येमाई – शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाईच्या बच्चे वस्तीवर आज रविवारी पहाटे चारच्या दरम्यान विलास विठ्ठल बच्चे यांच्या घरासमोर बांधलेल्या जनावरांतून एकासात महिन्याच्या जर्शी कालवडीवर बिबट्याने हल्ला करीत तिला ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे विलास यांनी सांगितले.
बच्चे वस्ती परिसरात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर असून परिसरात अनेक पाळी कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे बच्चे यांनी सांगितले. आज पहाटे बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने व घरासमोर काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येवून ही भीतीमुळे घराबाहेर पडता आले नाही व बिबट्याने कालवडीवर हल्ला करीत तिला ठार केल्याचे व शेजारीच बांधलेल्या दुस-या कालवडीच्या गळ्याला ही बिबट्याने हल्ला केल्याने ती कालवडही जखमी झाल्याचे भयभीत झालेल्या विलास बच्चे यांनी सांगितले.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वनकर्मचारी हनुमंत कारकूड हे सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत. शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळणार असल्याचे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या पशुधनाचे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याकामी योग्य ती खबरदारी व उपाययोजना घेण्याचे आवाहन वनपाल गणेश पवार,वनरक्षक नारायण राठोड यांनी केले आहे. बिबट्याच्या दहशतीने या परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने येथे तात्काळ पिंजरा लावावा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश सांडभोर व ग्रामस्थांनी केली आहे.
कवठे येमाईत बिबटयांचे पाळीव जनावरांवर हल्ले सुरूच
