ठाणे – कल्याण – डोंबिवलीमध्ये पुढील तीन महिने सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन विभागातील नागरिकांना करण्यात आले.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधील आत्ताची पाण्याची उपलब्धता पाहता शहरांना ऑगस्ट अखेरपर्यंत नियमित पाणी पुरवठा करताना ३२ टक्के पाण्याची तूट येण्याची शक्यता आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी ठाणे पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी ९ मे पासून कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा दर सोमवार, मंगळवार येत्या तीन महिन्यांपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उल्हास नदीवरील बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम, शहाड, वडवली, टिटवाळा, मांडा, आंबिवली, डोंबिवलीला नेतिवली केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार.
ठाण्यात आज पाणी नाही
ठाणे महानगरपालिकेने राबोडी परिसरात पुल बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे उद्या ठाण्यातील अनेक भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात आली होती, त्यानंतर आता उन्हाळ्यात पुन्हा ठाण्यात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.