कल्याण – चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. या परिसरातील नागरिकांना गेले काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर पालिका प्रशासनाने आश्वासन दिले आहे.
चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत परिसरातील नागरिकांनी पाणीटंचाई संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची दखल शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी घेतली. त्यांनी परिसरात दौरा करत नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पालिका अधिकारी मोरेश्वर राणे यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर पाणीप्रश्न सोडवा अशी विनंती केली. त्यावर पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.