बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचा हतिप्तूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते के सदक्षरी यांनी १७,००० हून अधिक मतांनी पराभव केला.
कर्नाटकात हिजाबचा मुद्दा पुन्हा गाजत होता, तेव्हा शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी अतिशय वादग्रस्त विधाने केली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात झालेल्या परीक्षेपूर्वी त्यांनी हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे जाहीर केले होते. हिजाब बंदीनंतर मुस्लीम विद्यार्थ्यांच्या परीक्षेला बसण्याचे प्रमाण वाढले असल्याचा दावाही मंत्री नागेश यांनी केला होता.
नागेश यांनी कुराण आणि बायबलसारख्या धार्मिक ग्रंथांवरही वादग्रस्त विधाने केली होती. बायबल आणि कुराणसारख्या धार्मिक पुस्तकांची भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला अनेक मुस्लिमांनी विरोधही केला होता. या प्रकरणावरही बरेच राजकारण झाले होते. याचा फटका त्यांना निवडणुकीत बसल्याचे दिसून आले.