बंगळुरू-तिरुपतीतील लाडूच्या प्रसादाबाबतचा वाद अद्याप शमला नसताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, अन्य प्रसाद व महाप्रसाद बनवताना तसेच आरती व दिव्यांसाठी ‘नंदिनी’ तूपच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मादाय खात्याने तसा आदेश राज्यातील सर्व मोठ्या मंदिरांसह धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक सर्व मंदिरांना दिला आहे.
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात चरबी तसेच माशांच्या तेलाचा वापर आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. यामुळे कर्नाटक राज्य धर्मादाय खाते परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी धर्मादाय खात्याला महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. या सूचनेनुसार कर्नाटकातील धर्मादाय खात्याने कोणत्याही खासगी दूध संस्थेत तयार होणारे तूप तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ मंदिरातील प्रसादासाठी तसेच महाप्रसादासाठी वापरू नये.मंदिरात लावण्यात येणारे दिवे, आरती व सेवेच्या काळात वापरण्यात येणारे तूप हे नंदिनीचेच वापरावे, असा आदेश बजावला.