कर्नाटकात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक

बेळगाव- विधानसभा व लोकसभेत महिलांना ५० टक्के वाटा मिळेल तेव्हा मिळेल; पण मतदान प्रक्रियेत कर्नाटकातील महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण कर्नाटक राज्यात आता महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक झाली आहे. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार ही आकडेवारी पुढे आली आहे. निवडणूक विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यातील २२१ विधानसभा मतदारसंघातील महिला मतदारांची संख्या २.७२ कोटींवर पोहोचली आहे. तर पुरुष मतदारांची संख्या २.७१ कोटी आहे. ५,०२२ मतदार तृतीयपंथी आहेत.चन्नपट्टण, शिग्गाव व सांडूरमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असल्याने या यादीत वरील तीन मतदारसंघातील मतदारांचा समावेश केलेला नाही. या तीन मतदारसंघांतील मतदार संख्या यादीत समाविष्ट केली तरी महिलांची संख्या पुरुषांपेक्षा ३६,६४२ ने अधिक आहे. सध्या तरी किनारपट्टीसह काही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे. मतदारांना २८ नोव्हेंबरपर्यंत या यादीवर आक्षेप नोंदवता येणार आहेत. तर अंतिम यादी ६ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महिलांच्या या वाढलेल्या संख्येला निवडणुकीच्या राजकारणात महत्त्व आले आहे.या संख्येमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.रोजगारासाठी पुरुषांचे राज्याबाहेर स्थलांतर वाढल्याने हा बदल झाला असावा, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top