कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार

नवी दिल्ली- आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची नुकतीच दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता कर्नाटकमध्ये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. तसेच काँग्रेस आपल्या 110 उमेदवारांची पहिली यादी उद्या सोमवारी जाहीर करणार असल्याचे देखील या बैठकीत ठरवले.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या झालेल्या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींसह अन्य काँग्रेसचे नेते उपस्थित होते. ‘कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्हेी ठेवले आहे. एसडीपीआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) आणि अन्य कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस युती करणार नाही, असे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमधील विधानसभेची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्याआधी विधानसभा निवडणुका होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार आहे. विद्यमान आमदारांपैकी चार पाच जणांचा अपवाद वगळता अन्य आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारी देताना युवक आणि महिलांना प्राधान्य देणार आहे.

Scroll to Top