कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेमध्ये झालेल्या १३ कोटी २८ लाख ०१ हजार ८९९ रुपयांच्या अपहार प्रकरणी जिल्हा परिषदेतील निवृत्त कर्मचारी सुबराव रामचंद्र पवार यांनी तक्रार दाखल केली होती. काल रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अध्यक्ष अतुल कारंडे याच्यासह संचालक मंडळ व इतर अशा ३४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संस्थेचे सभासद सुबराव पवार यांच्यासह अन्य ठेवीदार पतसंस्थेत ठेवी काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यातील रक्कम त्यांना दिली नाही. त्यानंतर फिर्यादी व ठेवीदार यांनी संस्थेच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधला. परंतु, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ठेवी देण्यास टाळाटाळ केली. कुरुकलीतील हनुमान सहकारी दूध संस्थेचा या पतसंस्थेशी काहीही संबंध नसताना या संस्थेचे शुभम एकनाथ परीट यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या चालू बँक खात्यावरून खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून वेळोवेळी आर्थिक फायद्याकरिता रक्कम काढून त्या माध्यमातून स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले.