न्यूयॉर्क – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी कमला हॅरिस यांना देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देणगीदारांनी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या द्यायला सुरुवात केली आहे.
कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी अवघ्या २४ तासात ८१ दशलक्ष डॉलरचा निधी जमा झाला आहे. बायडेन यांच्या प्रवक्त्याने ही माहीती दिली.
डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी आणि संयुक्त निधी संकलन कमिट्यांच्या माध्यमातून या देणग्या गोळा केल्या गेल्या आहेत.कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी एका दिवसात जमा झालेली ही विक्रमी रक्कम असल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले. एवढ्या प्रचंड प्रमाणात निधी संकलन होणे हे जनतेच्या मनात कमला हॅरिस यांनीच अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, याचेच निदर्शक असल्याचे मानले जाते आहे.डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत उमेदवारी पुढील महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये औपचारिकपणे जाहीर केली जाणार आहे.कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या निम्म्यापेक्षा जास्त गव्हर्नरांनी यापूर्वीच आपला पाठिबा जाहीर केला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही हॅरिस यांच्याच नावाला पसंती दिली आहे. स्वतः अध्यक्ष बायडेन यांनीच कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस केल्यामुळे कमला हॅरिस यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणाच बाकी आहे.