भिवंडी – भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या ९ वर्षांतील कामकाजाची माहिती जनतेसमोर सादर करण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आमदार कथोरे यांनाच टीकेचे लक्ष्य केले.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या पत्रकार परिषदेत माळशेज घाटातील काचेच्या पुलाचा उल्लेख करत आमदार किसन कथोरे यांच्यावर टीका केली. याआधी आमदार कथोरे यांनी त्यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात येणार्या माळशेज घाटात काचेचा पूल बांधला जाणार असून त्याच्या उभारणीसाठी आपण पाठपुरावा करून त्याचा डीपीआर मंजूर केल्याचे म्हटले होते. मात्र असे काहीच घडले नसल्याचे सांगून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या आमदार किसन कथोरे यांना टोला लगावल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कपिल पाटील- किसन कथोरे राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर
