सावंतवाडी- जिल्हा परिषदेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता मडूरा- सातोसे- सातार्डा – किनळे हा रस्ता उत्तम स्टील कंपनीला वर्ग केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता खड्डेमय बनल्याने ‘कदंबा’ परिवहन मंडळाने गोव्यातून सावंतवाडी येणार्या गाड्या बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गोव्यात नोकरी करणाऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून मडुरा दशक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी केली.
या रस्त्यावरून एसटी व कदंबाच्या फेऱ्या सुरू राहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आर्थिक पदरमोड करून ही रस्त्याची डागडुजी केली आहे. बांदा – निगुडे – रोणापाल मडूरे सातोसे मार्गे सातार्डा किनळे हा रस्ता जिल्हा परिषद अखत्यारीत आहे. उत्तम स्टील कंपनी परिसरातून जाणारा हा मार्ग तत्कालीन प्रशासनाने कंपनीला वर्ग केला.कंपनीने बदल्यात कोकण रेल्वे मार्गानजीक पर्यायी रस्ता दिला.मात्र,या रस्त्याला कोकण रेल्वे प्रशासनाने हरकत घेतली आहे.त्यामुळे गोव्याकडे जाणारा मार्गच भविष्यात बंद होण्याची नामुष्की ओढवली आहे.सध्या या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून बस चालवणे बंद करण्याचा इशारा कदंबाने दिला आहे. मात्र मडुरा दशक्रोशीतील शेकडो लोक गोव्यात नोकरीसाठी जात असतात.बस बंद झाल्यास त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते.त्यामुळे या ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी स्वतःच श्रमदान करून रस्ता दुरुस्त केला आहे.