ओबीसी-आदिवासींची एकजूट नको काँग्रेसचे षड्यंत्र! मोदींचा धुळ्यात हल्लाबोल

धुळे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात प्रचाराचा नारळ वाढविला. आपल्या पहिल्या प्रचार सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरुद्ध काहीच वक्तव्य केले नाही. त्यांनी केवळ काँग्रेसवर घणाघाती टीका केली आणि आरोप केला की, ओबीसी आणि आदिवासी यांची एकजूट होऊ नये म्हणून त्यांच्या पोटजातींना आपसात लढविण्याचे षड्यंत्र काँग्रेस रचत आहे. हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. यासाठीच ‘एक है तो सेफ है’ हे लक्षात ठेवा.
आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला जी गती प्राप्त झाली आहे ती सुरू राहील. महाराष्ट्राला महायुतीच सुशासन देऊ शकेल.
मविआच्या गाडीला ब्रेक नाही, ड्रायव्हरच्या सीटसाठी वाद सुरू आहेत. आम्ही जनतेची सेवा करायला आलो तर मविआ जनतेला लुटायला आले आहेत. ते सत्तेवर आले तर लुटायला सुरू करतात. त्यांनी मेट्रो योजना ठप्प केली. वाढवण बंदरामध्ये अडचण आणली. समृद्धीत खोडा घातला. महाराष्ट्राच्या जनतेचे भविष्य उज्ज्वल होईल त्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी खोडा घातला. महायुतीचे सरकार आले तेव्हा ही लूट थांबली. भाजपा महायुती आहे तर गती आहे, प्रगती आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यातील दहा वचनांची खूप चर्चा सुरू आहे. प्रत्येक वर्गाच्या आर्थिक प्रगतीची घोषणा आहे. विकसित महाराष्ट्रासाठी महिलांची प्रगती, त्यांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. हे काँग्रेसला सहन झाले नाही. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले. त्यांना सत्ता मिळाली तर योजना बंद करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यासाठी महिलांनी मविआपासून सावध
राहिले पाहिजे.
मविआ नेते महिलांबाबत अभद्र भाषा वापरू लागले आहेत. केंद्रात काँग्रेस सरकार असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. हे काम मोदींनी कसे केले याचे त्यांना आश्‍चर्य वाटते. विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिल्या पसंतीचे राज्य आहे. सर्व गुंतवणूक योजनेत महाराष्ट्राला प्राधान्य दिले जात आहे. महायुती सत्तेवर आल्यावर वाढवण बंदराजवळ पालघरला विमानतळ सुरू करण्याचा
विचार करू.
काँग्रेसच्या एका षड्यंत्राची माहिती देण्यासाठी आलो आहे. त्यांनी एका जातीला दुसर्‍या जातीशी लढवत ठेवण्याचा खेळ सुरू केला आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना आरक्षण मिळवू द्यायचे नव्हते, त्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला. ओबीसी आणि आदिवासी यांची एकजूट होऊ नये म्हणून काँग्रेस ओबीसी व आदिवासींना वेगवेगळ्या जातीत विखुरत आहेत. काँग्रेसचे हे षड्यंत्र हाणून पाडून आपण विकासाच्या दिशेने जायचे आहे. यासाठीच ‘एक है तो सेफ
है’ हे लक्षात ठेवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top