कॅनबेरा
ऑस्ट्रेलियन सरकारने लष्करी ऑपरेशन्स किंवा गस्तीदरम्यान सैनिकांच्या मद्यपानावर बंदी घातली आहे. २०२० मध्ये झालेल्या २३ घटनांच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन लष्करी तुकडी अफगाणिस्तानात तैनात होती. या युनिटच्या सैनिकांनी केवळ सरावासाठी ३९ सामान्य अफगाणी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे ऑस्ट्रेलियावर जागतिक स्तरावर टीका झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्रालयाने युद्ध गुन्ह्याखाली तपास केला. २०२० सालच्या घटनांच्या तपासादरम्यान ऑस्ट्रेलियन सैन्याला आढळून आले की, अफगाणिस्तानमधील ऑस्ट्रेलियन सैनिकांच्या बेस कॅम्पमध्येही एक पब आहे. या पबमध्ये स्पेशल फोर्सचे शिपाई आणि अधिकारी जातात. त्यांच्या मद्यपानावर कोणतेही बंधन किंवा मर्यादा नव्हती. पुढे याच अवस्थेत ते मोहिमेवर जातात. अफगाणिस्तानमध्ये तैनात असताना ऑस्ट्रेलियन सैनिकांनी २३ बनावट चकमकी केल्या आणि ३९ नागरिकांची हत्या केली.