नागपूर – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या पदरी मोठे अपयश पडले. त्यानंतर भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्रामधून या अपयशाचे खापर फोडाफोडीचे राजकारण करून अजित पवार यांच्या पक्षाशी केलेल्या युतीवर फोडण्यात आले होते. या युतीमुळे भाजपाची ब्रँड व्हॅल्यू घसरली, अशी जाहीर टीकाही करण्यात आली होती. ‘ऑर्गनायजर’नंतर आता संघ विचारांचे साप्ताहिक ‘विवेक’नेही तसाच सूर आळवत अजित पवार यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही, असे स्पष्ट नमूद करत शिवसेनेबरोबरची युती जशी नैसर्गिक आहे, तशी भावना राष्ट्रवादीबरोबरच्या युतीबाबत नसल्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे ‘विवेक’मधील लेखात म्हटले आहे. अजित पवार गटावर संघ विचारांच्या नियतकालिकांतून वारंवार अशी टीका होत असल्याने त्यांच्यातील धुसफूस पुन्हा एकदा उफाळून येणार आहे.
साप्ताहिक ‘विवेक’च्या ताज्या अंकात ‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात’ या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात भाजपाने अजित पवारांना सोबत घेतल्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीला महायुतीत घेतल्याने भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या लेखात असे म्हटले आहे की, राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे. भाजपामधील कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे ती प्रक्रियाच पुढील काळात दुर्मीळ होत जाईल की काय, अशी एक प्रकारची भीती वा शंका कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली आहे. याला काही प्रमाणात हिंदुत्व विरोधकांनी सोशल मीडियावरून यशस्वीपणे चालवलेला नरेटिव्ह हेही एक कारण आहे. जसे की, भाजपा हा आयातांचा पक्ष बनत चालला आहे, भाजपा ‘वॉशिंग मशीन’ आहे, भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला. परंतु दुसरीकडे सोशल मीडियावरून हिंदुत्वाची बाजू मांडणार्या ज्येष्ठ मंडळींबाबतीत जो प्रकार काही व्यक्तींनी अगदी अलीकडे केला. त्यामुळे चुटकीसरशी या अस्वस्थतेला बळ मिळाले आणि गावागावांत चुकीचा संदेश गेला हेही खरेच. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसर्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे.
‘ऑर्गनायजर’मधून टीका झाल्यावर काही भाजपा नेत्यांनीही अजित पवार गटामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीला फटका बसला, असे म्हणायला सुरुवात केली होती. त्यामुळे बिथरलेल्या अजित पवार गटाने अजित पवारांना सातत्याने टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. तसे काहीच घडले नसले तरी अजित पवार गटात या टीकेमुळे अस्वस्थता पसरली होती. त्यात आता ‘विवेक’मधील टीकेमुळे भर पडणार आहे. या टीकेला अजित पवार गटाकडून कसे उत्तर देईल, याची उत्सुकता आहे.
दरम्यान,‘विवेक’मधील टीकेबद्दल शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की, आता ‘ऑर्गनायझर’ आणि ‘विवेक’ यांच्या मागे कोणती विचारधारा आहे, याचा शोध घ्यावा लागेल. ते ज्या अर्थाने असे म्हणताहेत, त्यानुसार त्यांच्या विचारांचे जे घटक आहेत, ते त्यांच्यात अजित पवारांबद्दल अस्वस्थता आहे, हे स्पष्ट होत आहे.
अजित पवार परत आले तर
सगळ्यांना विचारून त्यांना घेणार
आज शरद पवार यांच्या पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना, अजित पवार तुमच्याकडे परत येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहते. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले. त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाले तर पक्षात घेईन.