मुंबई- मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार,आता दादर स्थानकातून अतिरिक्त १० लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. परळ स्थानकातून अतिरिक्त २४ फेऱ्या सुरू होणार आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या १० फेऱ्या दादर स्थानकातून सुरू करण्यात येणार आहे. यात ५ अप आणि ५ डाउन लोकलचा समावेश आहे. दादरमधील फलाट क्रमांक १० हा डबल प्लॅटफॉर्म झाला आहे. यामुळे जलद लोकल दोन्ही बाजूने ये-जा करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
फलाट क्रमांक १० दुतर्फा केल्यामुळे दादर स्थानकातील मेल-एक्स्प्रेसचे संचालन अधिक सोपे झाले आहे. एका मेल-एक्स्प्रेसमागे सुमारे एक ते दोन मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या नव्या वेळापत्रकाने कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याणपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याने दिवा, डोंबिवली, कल्याणमधील प्रवाशांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.