मुंबई- यंदा नवरात्र उत्सवानिमित्त दादरच्या फूल बाजारात फुलांची आवक वाढली असल्याने फुलाचे दर ६० टक्क्यांनी घसरले आहेत.त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसत असला तरी ग्राहकांकडून मोठी खरेदी केली जात आहे.
गणेशोत्सवाला विविध फुलांच्या दरात ५० ते ६० टक्के वाढ झाली होती. यंदा नवरात्रोत्सवात दादरच्या फूल बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक वाढली असल्याचे दिसत आहे.महाराष्ट्र व इतर राज्याच्या विविध भागांतून दादर फूल बाजारात झेंडू, लिली, शेवंती, गुलाब, मोगरा, चाफा, चमेली, अबोली, कन्हेरी फुले व हार विक्रीमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे.गणेशोत्सव सणाच्या तुलनेत फुलांचे दर घसरले असल्याने झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना १०० ते १५० रुपये भाव होता.सध्या झेंडू प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांना मिळत आहे. झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने घाऊक बाजारात झेंडूच्या फुलांच्या दरात घट झाली आहे.