नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने एसी अर्थात एअर कंडिशनर आणि एलईडी लाइट्ससह पांढर्या वस्तूंसाठीच्या पीएलआय योजनेला पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे.या योजनेसंदर्भातील अर्ज १५ जुलैपासून पुढील ९० दिवसांमध्ये सादर करावयाचे आहेत,अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली.
पीएलआय म्हणजेच उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास इच्छुक कंपन्यांकडून नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी आणि लाभ मिळविण्यासाठी १५ जुलै ते १२ ऑक्टोबरपर्यंत
विंडो उघड्या राहणार आहेत.या कालावधीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.या योजनेअंतर्गत सरकार भारतात उत्पादित वस्तूंच्या वाढीव विक्रीवर वित्तीय प्रोत्साहन देते.याआधी ही पीएलआय योजना २०२१ मध्ये १४ क्षेत्रांसाठी जाहीर करण्यात आली होती, ज्यात दूरसंचार,पांढरे सामान, कापड,वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन,ऑटोमोबाईल्स, विशेष स्टील, खाद्य उत्पादने, उच्च-कार्यक्षमतेचे सोलर पीव्ही मॉड्यूल, प्रगत रसायनशास्त्र सेल बॅटरी, ड्रोन यांचा समावेश आहे.या योजनेसाठी आतापर्यंत ६९६२ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन असलेले ६६ अर्जदार पीएलआय योजनेंतर्गत लाभार्थी म्हणुन निवडले गेले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की पीएलआय योजनेअंतर्गत उद्योगांना अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा आहे.या योजनेअंतर्गत मागविण्यात आलेल्या अर्जांची ही तिसरी फेरी आहे.