एसटी ९ वर्षांनी नफ्यात तब्बल १६ कोटींचा नफा 

मुंबई – एसटी महामंडळ गेले काही वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणेही महामंडळाला शक्य झालेले नाही. मात्र एक आनंदाची बातमी आहे. गेल्या ९ वर्षात एसटी पाहिल्यांदाच नफ्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात एसटीला १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये इतका नफा झाला आहे.
दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. गेली पाच ते सहा वर्ष एसटीवर अनेक आर्थिक संकटे आली. एसटीने वृद्ध, महिला, विद्यार्थी प्रवाशांसाठी विविध योजना जाहीर केल्या. ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. याच बरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्याने कमी करण्यात आले. डिझेलची बचत करण्यात आली. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिणाम म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख ६१ हजार इतका नफा प्राप्त झाला आहे. 
तब्बल ९ वर्षांनी, ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात देखील महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. एसटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वमालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top