एसटी पाठोपाठ स्कूल बसच्या शुल्कात तब्बल १८ टक्के वाढ

मुंबई- एसटी महामंडळाने राज्यातील जनतेवर तिकिटात १४.९५ टक्के भाडेवाढ लादल्यानंतर आता शाळकरी मुलांसाठी असलेल्या स्कूल बसची दरवाढ झाली आहे. स्कूल बस मालक असोसिएशनने स्कूल बस शुल्कात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईसह राज्यभरात १ एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होईल.त्यामुळे पालकांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

मुंबईसह राज्यभरात सध्या ५ किलोमीटर अंतराच्या प्रवासात प्रत्येक मुलासाठी दरमहा किमान १२०० रुपये इतके बस शुल्क आकारले जात आहे.त्यात आणखी १५० रुपयांची वाढ होणार आहे.आरटीओने वाढवलेला दंड,दुपटीने वाढलेले पार्किंग शुल्क,बसमध्ये लावण्यात येणाऱी जीपीएस सिस्टम, सीसीटीव्ही व अन्य सुरक्षेच्या उपकरणांचा वाढीव खर्च,त्याचबरोबर स्कूल बसचे ड्रायव्हर, महिला अटेंडंट आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मॅनेजरचा वाढीव पगार अशी विविध कारणे देत भाडेवाढ करण्यात आली आहे.शाळकरी मुलांची ने-आण करण्यात बेकायदेशीर खासगी वाहनांचा वापर वाढला आहे.ती वाहने मुलांच्या सुरक्षेची खबरदारी घेत नसतानाही सरकार त्यांच्यावर कारवाई करीत नाही.त्यांच्या बेकायदेशीर शिरकावामुळे अधिकृत स्कूल बसचालकांना नुकसानीची झळ पोहोचली आहे. त्यासह उत्पादकांनी बस आणि सुट्या भागांच्या किमतीत वाढ केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top