पुणे- एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. मुलींमध्ये सातारा जिल्ह्यातील सोनाली भिसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मागासवर्गीय प्रवर्गातून यवतमाळ जिल्ह्यातील गजानन राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एमपीएससीतर्फे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या १६४ पदांचा समावेश होता. एमपीएससीतर्फे न्यायालयाचे आदेश आणि संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासनस्तरावर मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अधीन राहून हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खेळाडू आणि इतर वर्गवारीमध्ये शिफारस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकालामध्ये तात्पुरते समाविष्ट करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी शासनाकडून करण्याच्या आधीन राहून ही शिफारस केली गेली आहे.