मुंबई- मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी सल्लागार कंपनी म्हणून काम करणाऱ्या फ्रान्सच्या सिस्त्रा या कंपनीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. हे अधिकारी थेट आयुक्तांचे नाव घेत लाच मागतात, लाच मिळत नाही तोवर काम अडवतात, कंत्राटदारांची बिले वाढवून देण्यासाठी दबाव आणतात, निवडक कंत्राटदारांकडूनच काम करून घेण्याचा दबाव आणतात, असे गंभीर आरोप सिस्त्राने लेखी केले आहेत. 2023 सालापासून हे प्रकार घडत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्या काळात हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते.
एमएमआरडीएने या आरोपांचे खंडन केले असून, सिस्त्रानेच नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
भारतातील फ्रान्सच्या दुतावासाला सिस्त्राने तक्रारीचे हे पत्र लिहिले आहे. मुंबई मेट्रोच्या 5, 6, 7अ, 9, 10 आणि 12 या मार्गिका, मेट्रो 2अ आणि 7 या मार्गिकांचे संपूर्ण आरेखन, या मेट्रो मार्गिकांवरील डेपोंची उभारणी ही कामे सिस्त्रा कंपनीकडे आहेत. कंपनीने म्हटले आहे की, ऑगस्ट 2023 मध्ये एमएमआरडीएमध्ये वरिष्ठ स्तरावर फेरबदल झाल्यापासून कंपनीला त्रास देण्यास सुरुवात झाली. उच्चपदस्थ अधिकारी थेट आयुक्तांचे नाव घेत लाच मागू लागले आहेत. कोणत्याही कामासाठी लाच देणे हे कंपनीच्या धोरणात बसत नाही. त्यामुळे कंपनीने लाच देण्यास नेहमीच नकार दिला. त्यामुळे विविध मार्गाने त्रास देण्यास सुरुवात झाली. कंत्राटदारांची बिले वाढवून देण्यासाठी दबाव आणला जाऊ लागला, असे सिस्त्राने या पत्रात म्हटले आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5, दहिसर-मिरा-भार्इंदर मेट्रो 9, गुंदवली-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 7 अ आणि लोखंडवाला-विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांवर कामातील काही दोष एमएमआरडीएने दाखवून दिले होते. त्या दोषांचे कंपनीने निवारण केले होते. असे असताना त्याच मुद्यांवर जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 दरम्यान एमएमआरडीएने कंपनीला नोटिसा पाठवून त्यांची बिले रोखली. त्याचबरोबर गायमुख-शिवाजी चौक मेट्रो 10 आणि कल्याण-तळोजा मेट्रो 12 च्या कामांमध्ये एमएमआरडीएने यंत्रणाविषयक आणि अभियांत्रिकीविषयक काही त्रुटी दाखविल्या होत्या. त्या कंपनीने दूर केल्या. त्यानंतरही त्याच त्रुटींबाबत नोटिसा पाठवून बिले रोखण्यात आली. याबद्दल कंपनीने आक्षेप नोंदवल्यानंतर एमएमआरडीएने मेट्रो 5,6,9 आणि 7 अ या मार्गिकांच्या यंत्रणाविषयक कामांची रोखलेली बिले दिली. मात्र 5,9 आणि 7 अ या मार्गिकांवरील अभियांत्रिकीविषयक कामाची 30 कोटी रुपयांची बिले आजही थकीत आहेत. मेट्रो 9 मार्गिकेच्या कंत्राटदारांची वाढीव बिले मंजूर करून सरकारकडे पाठवावी यासाठी दबाव टाकण्यात आला. कंपनीने तसे करण्यास नकार दिल्यामुळे एमएमआरडीएने बिले रोखून धरली आहेत, असे एकाहून एक गंभीर आरोप सिस्त्राने या पत्राद्वारे केले.
आपल्याप्रमाणेच मेट्रो 4 साठी सल्लागार कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या जर्मनीच्या डीबी ई अँड सी या कंपनीलाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून अशाच प्रकारे त्रास दिला जात आहे, असा दावाही सिस्त्राने केला आहे. सिस्त्रा आणि डीबी ई अँड सी या कंपन्या मेट्रो 10 आणि 12 या मार्गिकांसाठी एका कन्सॉर्टियममध्ये भागीदार आहेत. या प्रकल्पांच्या कामाची बिलेदेखील एमएमआरडीएने रोखून ठेवली आहेत. यातील काही कामांमधील त्रुटींसाठी पाठविलेल्या नोटिसा एमएमआरडीएने मागे घेतल्या आहेत. एवढे कमी म्हणून की, काय एमएमआरडीएने महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्याचे प्रस्ताव रोखले आहेत. मनमानी दंड आकारणे, एमएमआरडीएने थेट नेमलेल्या छोट्या कंत्राटदारांच्या बिलांच्या पावत्या मागणे अशा प्रकारे एमएमआरडीए आपली कोंडी करत आहे, असे सिस्त्राचे म्हणणे आहे.
एमएमआरडीएने मात्र सिस्त्राचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सिस्त्राच्या कामांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. त्यातील काही सुरक्षेशी संबंधित आहेत. तर काही अभियांत्रिकी कामासंबंधित आहेत. कंपनीने अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले आहे. सिस्त्राने वाढीव फीची मर्यादा 4.27 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात आली असून, तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सरकारला सादर करण्यात आला आहे. हा वाद राज्य सरकार आणि सिस्त्रा कंपनीमधील आहे. मात्र जाणूनबुजून कंपनी तो भारत आणि फ्रान्समधील वाद असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.
देशभरात रेल्वेची कामे
फ्रान्सची बडी कंपनी
सिस्त्रा ही 1957 साली पॅरिस येथे स्थापन झालेली कंपनी आहे. ही कंपनी जगभरात रेल्वेशी निगडित कामे करते. भारतात नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो, चेन्नई मेट्रो, सुरत मेट्रो, हैदराबाद विमानतळ मेट्रो या कामात ही कंपनी सल्लागार आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क भुयारी रेल्वे, ग्रँड पॅरिस एक्स्प्रेस, कैरो मेट्रो (इजिप्त), मेक्सिको सिटी मेट्रो, दुबई मेट्रो, मध्य लंडन मेट्रो आदि महत्त्वाच्या योजनांत सल्लागार, भागीदार, अभियंता अशा विविध जबाबदाऱ्या कंपनीने पार पाडल्या आहेत.
एमएमआरडीए प्रचंड भ्रष्टाचारी! पैशासाठी काम थांबवले! मेट्रोची कामे करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा आरोप
