नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा १६६ वा भाग आज झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमादरम्यान म्हणाले की १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदजींच्या १६२ व्या जयंतीनिमित्त एका खास पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ११ व १२ जानेवारी रोजी भारत मंडपम येथे युवकांचा महाकुंभ होणार आहे. यामध्ये कोट्यवधी युवक सहभागी होणार आहेत. तुम्हाला आठवत असेल की लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ज्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी नाही अशा तरूणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते. अशा एक लाख तरुणांना राजकारणाशी जोडण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ येणार आहेत. मीही यावेळी उपस्थित राहणार आहे. ही देशाच्या भावी पिढीसाठी मोठी संधी असणार आहे.
ते पुढे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी आम्ही एक पेड माँ के नाम या नावाने मोहीम सुरू केली होती. या मोहिमेने केवळ पाच महिन्यात १०० कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पार केला आहे. याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट जाणून तुम्हाला अभिमान वाटेल की ही मोहीम आता जगातील इतर देशांमध्येही पसरत आहे. गयानामध्येही गयानाचे राष्ट्रपती त्यांच्या कुटुंबीयांसमवेत एक पेड माँ के नाम या मोहिमेत सहभागी झाले होते. देशाच्या विविध भागात ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सहभागी होऊन कोणतीही व्यक्ती आपल्या आईच्या नावाने एक झाड लावू शकते. आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, पण एक झाड लावून तिचे अस्तित्व जिवंत करू शकतो.