मुंबई – बॉलिवूडच्या झगमगाटी दुनियेपासून फारकत घेत आजवर अनेक नामवंत कलाकारांनी भक्तीचा मार्ग पत्करला.त्यापैकीच एक ताजे नाव म्हणजे बरखा मदान.एकेकाळी आघाडीची मॉडेल, अभिनेत्री आणि सौंदर्यवती अशी ओळख असलेली बरखा सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून बौद्ध साध्वी बनली आहे.बरखाने १९९४ च्या मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांची स्पर्धक होती. मिस इंडिया किताबासाठी या तिघींमध्ये चुरस झाली होती. सुश्मिता सेन मिस इंडिया बनली. ऐश्वर्या दुसऱ्या स्थानावर तर बरखा तिसऱ्या स्थानावर होती. तिला मिस टुरिझम या किताबाने सन्मानित करण्यात आले होते.बरखाने १९९६ मध्ये खिलाडियों का खिलाडी या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने जेन ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिने काही टिव्ही मालिकांमध्येही काम केले होते. १८५७ क्रांती या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. दोन चित्रपटांचीही तिने निर्मिती केली होती. मात्र ते दोन्ही चित्रपट अपयशी ठरले. त्यानंतर तिने बॉलिवूडला राम राम ठोकला आणि ती बोद्ध साध्वी बनली. आता ती बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर अत्यंत साधेपणाने जीवन जगत आहे.
एकेकाळची आघाडीची मॉडेल सर्व त्यागून बौद्ध साध्वी बनली
