मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांनी या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तर सुरुवातीपासून या घोषणेला उघड विरोध केला आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचे समर्थन केले. ते म्हणाले की, बटेंगे तो कटेंगे हा या देशाचा इतिहास आहे. आपण जर एकजुटीने राहिलो नाही, तर गुलाम बनू. परंतु एकजुटीने राहिलो तर काश्मीरच काय पाकिस्तानवरही तिरंगा फडकवू शकतो.
बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरून विरोधकांनी भाजपाला धारेवर धरले आहे. अशा प्रकारच्या घोषणा उत्तर प्रदेशमध्ये चालत असतील, पण महाराष्ट्रातील जनतेला ते मुळीच रुचणार नाही, अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी प्रचारसभांमधून वारंवार मांडली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना या घोषणेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी फडणवीस या घोषणेचे समर्थन करताना म्हणाले की, हिंदू एकजुटीने राहिले नाहीत तर काय होते, हे फाळणीने आपल्याला दाखवून दिले आहे. देशाचा इतिहास सांगतो की, जेव्हा-जेव्हा विखुरले गेलो तेव्हा गुलाम बनलो. जात, राज्य, समाजामध्ये जेव्हा आपला देश विभागला गेला तेव्हा आपण गुलाम बनलो. समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. आपण विभागलो गेलो तर तुकडे पडतील. त्यामुळे हिंदूंच्या एकजुटीसाठी अशा प्रकारची घोषणा देणे यात काहीही गैर नाही. त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की, हिंदूंची जर एकजूट झाली तर आपण काश्मीरच नव्हे तर पाकिस्तानचा
पराभव करून तिथेही आपला तिरंगा फडकवू शकू. फडणवीस पुढे म्हणाले की बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ मोदींनीदेखील सांगितला आहे. आज 350 जाती मिळून ओबीसी घटक आहे. ओबीसी आहेत म्हणून एक ताकद आहे. तो ओबीसी 350 जातींमध्ये विखुरला गेला तर ताकद राहणार नाही. आदिवासी, अनुसुचित जाती जमाती ही एक म्हणून ताकद आहे. पण त्यात 54 जाती आहेत. या जाती वेगळ्या झाल्या तर काय होईल? मी पंतप्रधान मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला महामंत्र म्हणतो. कारण हा संपूर्ण समाजाला एकत्र ठेवण्यासाठी दिलेला मंत्र आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपला विकास होईल असा त्याचा अर्थ आहे. काँग्रेस मात्र आपल्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे, असे फडणवीस म्हणाले.
अजित पवारांना जनतेचा मूड
समजायला थोडा वेळ लागेल
‘बटेंगे तो कटेंगे’ला अजित पवार यांनी केलेल्या विरोधाबद्दल फडणवीस म्हणाले की, ते अशा विचारधारेसोबत राहिले आहेत की, जी धर्मनिरपेक्ष आणि हिंदूविरोधी आहे. परंतु स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे वास्तविक धर्मनिरपेक्ष नाहीत. त्यांच्यासाठी हिंदुत्वाला विरोध हीच धर्मनिरपेक्षता आहे. अजितदादांना जनतेचा मूड समजायला थोडा वेळ लागेल. ते एकतर जनतेच्या भावना ओळखू शकले नाहीत अथवा या वक्तव्याचा अर्थ समजू शकले नाहीत. अथवा त्यांना बोलताना काही तरी वेगळेच सांगायचे होते. ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेशी असहमत असण्यामागे या तीनपैकी एखादे कारण असू शकेल.