मुंबई : मुंबई विमानतळ परिसराबाहेर एअर इंडियाच्या ६०० पदांच्या आयोजित भरतीसाठी १० हजारांहून अधिक उमेदवार दाखल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाकडून एकूण २७०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात ६०० जागांसाठी तब्बल १० हजार तरुण जमा झाल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.
एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीकडून सध्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २७०० जागा भरल्या जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही भरती राबवली जाणार आहे. याच भरतीच्या पहिल्या टप्प्याचे आज आयोजन करण्यात आले होते.या पहिल्या टप्प्यात एकूण ६०० जागांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. पण त्यासाठी तब्बल १० हजार बरोजगार जमा झाले. अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार आल्यामुळे येथे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला.
मुंबई विमानतळ परिसराबाहेर सकाळी साडेआठ वाजता मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. अर्ज भरण्यावरून उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी लोडर पदासाठी अर्ज भरून घेण्यात येत होते. अर्ज भरून घेतल्यानंतर एका डब्यात हे अर्ज जमा करण्यात येत आहेत,असा आरोप एका उमेदवाराने केला आहे. अर्ज भरल्यानंतर आम्हाला परीक्षेसाठी बोलावतील का नाही, याबाबत आणखी एका बेरोजगार तरुणाने शंका व्यक्त केली.