‘एअरो इंडिया’मध्ये वापरलेली विमाने खरी तेजस लढाऊ विमाने नव्हतीच! हवाईदल प्रमुखांची एचएएलवरील टीकेने खळबळ

बंगळुरु- भारतीय हवाईदलाच्या युद्धसज्जतेचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडविण्यासाठी बंगळुरुमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एअरो इंडिया शोमध्ये वापरण्यात आलेली तेजस एमके 1 ए लढाऊ विमाने खरी तेजस विमाने नव्हतीच,असा आरोप हवाईदल प्रमुखांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हवाईदल प्रमुख अमरप्रित सिंग यांचा तेजसची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हवाईदल प्रमुख तेजस विमानांच्या खरेपणावर शंका घेताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये हवाईदल प्रमुख सिंग एचएएल कंपनीच्या अधिकाऱ्यांची कडक शब्दांत हजेरी घेताना दिसतात. ते म्हणाले की, मी फक्त तुम्हाला आमच्या गरजा आणि अडचणी सांगू शकतो, तुम्ही त्या गरजा समजून घेऊन त्याबरहुकूम पुरवठा केला पाहिजे. पण मला आता एचएएलबद्दल विश्वास वाटत नाही. तुम्ही जे केले ते अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दांत सिंग यांनी संताप व्यक्त केला.
सिंग एका विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून बोलत आहेत असे या व्हिडिओमध्ये दिसते. एअरो इंडिया शोसाठी मागविलेली तेजस एमके 1 ए जातीची 11 विमाने नियोजित वेळेत न पुरविल्याबद्दल सिंग एचएएल कंपनीबद्दल नाराजी व्यक्त करतात. पुढे तर शोमध्ये वापरण्यात आलेली तेजस विमाने खरी तेजस एमके 1 ए नाहीत असा आरोप करत ऐनवेळी थातूरमातूर बदल करून खरी तेजस एमके 1 ए विमाने बनवता येत नाहीत, अशा शब्दांत सिंग अधिकाऱ्यांना खडे
बोल सुनावतात.
सिंग यांच्या या व्हिडिओमुळे संरक्षण मंत्रालयात खळबळ उडाली असून, एचएएलच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ही कंपनी देशाच्या युद्धसज्जतेसाठी खरोखरच सक्षम आहे का, असा सवाल त्यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top