कोल्हापूर- यंदा अवकाळी पाऊस तसेच विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. गळीत हंगाम लांबल्याने अनेक ठिकाणच्या अडसाली उसाला तुरे फुटू लागले आहेत. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कोल्हापूर ऊस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ऊस उत्पादनात घट झाल्यास खते, बियाणे, मोलमजुरी, मशागत यांचा ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. सध्या उस दरासाठी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश संघटना आंदोलन छेडत आहे. काही साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामाचा दर जाहीर केला आहे. मात्र बहुतांशी साखर कारखान्यांनी दर जाहीर न केल्याने गळीत हंगाम लांबणीवर पडला आहे.तसेच अतिरिक्त पाऊस,ढगाळ,बदलते वातावरण,पूर यातून वाचलेल्या उसाला तुरे फुटल्याने यंदा उसाचे वजनही घटणार आहे. याचा परिणाम होणार म्हणून ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे.