उल्हासनगर दुर्घटनेच्या प्रतीक्षेत शेकडो कुटुंब भितीच्या छायेत

उल्हासनगर – उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील धोबीघाट परिसरात असलेल्या टेकडीवर शेकडो परिवार भितीच्या छायेत जीवन जगत असून उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन माळीण किंवा इर्शाळवाडी सारखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धोबीघाट परिसरात स्वामी विवेकानंद शाळेच्या मागे असलेल्या टेकडीवर रहिवासी वस्ती आहे. या ठिकाणी शेकडो परिवार वास्तव्य करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या घरांना लागून एखादी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र मागील वर्षी पालिकेने अर्धवट भिंत बांधली. निधीच्या अभावी काम पूर्ण करण्यात आले नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण असल्याने अनेक नागरिकांच्या घराजवळील काही भाग हा ढासळला आहे. तसेच काही नागरिकांच्या घरांना तडेदेखील जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर्षी पुन्हा स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून संरक्षण भिंत बांधून मिळाली यासाठी निवेदन सादर केले आहे. मात्र आद्यपदेखील पालिका प्रशासनाकडून यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासन माळीण किंवा इर्शाळवाडी सारख्या एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी या नागरिकांची सोय स्वामी विवेकानंद शाळेत केली होती. स्वतःचे हक्काचे घर असतानादेखील पावसाळ्यात आम्हाला दुसरीकडे वास्तव्य करावे लागते, अशी खंतदेखील नागरिकांनी व्यक्त केली.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, याबाबत संबंधीत विभागाला कळविण्यात येईल आणि लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top