उरण – तालुक्यातील चिरनेर परिसरात बर्डफ्ल्यू आजाराने थैमान माजवले आहे.आतापर्यंत बर्डफ्ल्यूमुळे १०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे बर्ड फ्लूला रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोंबड्या मारण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून एक हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
चिरनेरमध्ये १४ जानेवारी रोजी कुक्कुटपालकाच्या काही कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्डफ्ल्यूने मृत्यू आढळल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच ९ फेब्रुवारीपर्यत कोंबड्यांची खरेदी विक्री,बाजार यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे इतर कोंबड्यांनादेखील त्याची बाधा होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी चिरनेर येथील शेतकरी कुक्कुटपालकांना बाधित क्षेत्रातील मृत, आजारी, निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस,विष्ठा,अंडी महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. बाधित ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.खासगी वाहने देखील बाधित ठिकाणाच्या बाहेर पाचशे मीटर अंतरावर लावण्यात यावी, अशा सूचनादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.