उरण- राज्य सरकारने उरण तालुक्यातील पाणजे येथील २८९ हेक्टर क्षेत्राला पाणथळचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर राज्य सरकार आता उरणच्या या पाणथळ क्षेत्राच्या सुरक्षेसाठी १२० कोटी रुपयांच्या उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या सीसीटीव्हीची सुविधा निर्माण करणार आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने बुधवारी काढलेल्या ई- निविदेनुसार, एमएमआरमधील नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, भिवंडी, पनवेल आणि उरण या पाच झोनवरील पाणथळ क्षेत्राच्या ६६९ ठिकाणी एकूण १९५ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातारण पसरले आहे. पाणजे येथील २८९ हेक्टर पाणथळ क्षेत्राची जागा सिडकोने एनएमएसईझेडला भाडे भाडेतत्त्वावर दिल्याने पर्यावरण प्रेमींनी सिडकोच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोध केला होता. श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार आणि नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी सिडकोच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच सिडको पाणजे वॉटरबॉडी ही पाणथळ जमीन नसल्याचा आग्रह धरत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच या पर्यावरणवाद्यांनी पाणजे क्षेत्र पाणथळ म्हणून घोषित करा, या मागणीसाठी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. अखेर राज्य सरकारने पर्यावरणवाद्यांची ही मागणी पूर्ण केली आहे.