उरणमध्ये पहिल्यांदाच दिसली दुर्मिळ ‘लालकंठी तीरचिमणी’ !

रायगड- रशियामध्ये वीण करुन मुख्यत्वे आफ्रिका आणि दक्षिण-उत्तर आशियात स्थलांतर करणाऱ्या लाल कंठाच्या तीरचिमणीचे दर्शन प्रथमच उरण तालुक्यात झाले आहे. उरणच्या नवघर गावात या पक्ष्याचे दर्शन घडले असून राज्यात या पक्ष्याच्या ‘भटका पक्षी’ म्हणून तुरळक नोंदी आहेत. पाणथळ आणि गवताळ प्रदेशात स्थलांतर करणारे अनेक पक्षी राज्यात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत उरण यथे प्रथम लाल कंठाची तीरचिमणी या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षक वैभव पाटील यांना हा पक्षी उरण तालुतक्यातील नवघर येथील क्रिकेटच्या मैदानावर सोमवार १३ जानेवारी रोजी आढळून आला. नियमित पक्षीनिरक्षणादरम्यान त्यांना हा पक्षी दिसला.

हा पक्षी महाराष्ट्रात नियमितपणे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत येत नाही. प्रामुख्याने दक्षिण-उत्तर आशियामध्ये स्थलांतर करणारे हे पक्षी भरकटलेल्या अवस्थेत याठिकाणी येत असल्याची शक्यता आहे. लाल कंठाची तीरचिमणी हा गवताळ अधिवासांमध्ये स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा पक्षी युरोपच्या उत्तरेकडील भागात प्रजनन करतो आणि हिवाळी हंगामात लांब पल्लाचे स्थलांतर करतो. स्थलांतर करुन हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिका, दक्षिण आणि पूर्व आशिया आणि अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत जातो. महाराष्ट्रातील पालघर आणि अकोला जिल्ह्यात त्याची नोंद आहे. तसेच लोणावळा येथील टाटा धरण परिसरात देखील हा पक्षी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top