नांदेड- येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.त्यामुळे प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने आता उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवा हायटेक फंडा सुरू केला आहे.थेट मतदारांना रेकॉर्ड केलेला कॉल केले जात आहेत. मात्र याचा मतदारांना मनस्ताप होत आहे.
निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या आवाजातील रेकॉर्ड केलेले कॉल मतदारांना येत आहेत. नेत्यांचा कॉल संपताच संबंधित व्यक्तीच्या व्हॉटस्अॅपवरही मेसेज येत आहेत. या निवडणुकीत उमेदवारांनी हायटेक प्रचाराच्या मुद्द्यामध्ये सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर सुरू केला आहे.त्याचबरोबर हा मेसेजचा पॅकही नेत्यांनी घेतला आहे.त्यामुळे सकाळ,संध्याकाळ मेसेज मोबाईलवर येऊन धडकतात. सण, उत्सवाच्या शुभेच्छा ,जयंती दिनविशेष याचेही संदेश मतदारांना पोचविले जात आहेत.या हायटेक प्रचारावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे.