मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने १६ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या पनवेल ते रत्नागिरी तसेच पुणे आणि रत्नागिरी दरम्यान धावतील. यामुळे वर्षभरात मध्य रेल्वेने चालवल्या जाणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या ९५८ वर नेली आहे.
पनवेल-रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक अनारक्षित स्पेशल आठ फेऱ्यांसाठी धावेल, पनवेलहून ५ ते २६ मे पर्यंत दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी साडेचार वाजता रत्नागिरीला पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी येथून दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता पनवेल येथे पोहोचेल.ही गाडी रोहा, माणगाव,वीर,खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबेल.
तसेच पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी पुण्याहून दर गुरुवारी रात्री ८.५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी साडेसात वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीचा प्रवास रत्नागिरी येथून दर शनिवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल,रोहा,माणगाव,वीर, खेड,चिपळूण,सावर्डा, आरवली रोड,संगमेश्वर रोड येथे थांबेल.दोन्ही साप्ताहिक स्पेशलमध्ये २० जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असतील. प्रवाशांना सूचित केले जाते की, या गाड्या अनारक्षित म्हणून धावतील आणि सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जाऊ शकतात.