मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन दिवस पुलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने १२ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.हा मेगा ब्लॉक उद्या शनिवार १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गांवर आणि हार्बर मार्गांवर सेवा विस्कळीत राहणार आहे.
मेगाब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म उपलब्ध राहणार नसल्यामुळे सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावरील सर्व उपनगरीय सेवा आणि चर्चगेट ते गोरेगाव/बोरिवली दरम्यानच्या काही धीम्या गाड्या अंधेरी स्थानकापर्यंत चालविल्या जातील. तसेच सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना १० ते २० मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे.तसेच मेगाब्लॉक कालावधीत राम मंदिर स्थानकात गाड्या थांबणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुलाचे काम करण्यासाठी हा १२ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.