लातूर- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभेसाठी गेलेले उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांनी काल तपासणी केल्यानंतर आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील औसा येथील हेलिपॅडवर त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आल्याने ते भडकले. त्यावेळी संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी निवडणूक कर्मचार्यांना सवाल केला की, आतापर्यंत किती जणांची तपासणी केली? ही पहिलीच तपासणी आहे असे उत्तर आल्यावर ते म्हणाले की दरवेळी मीच पहिला गिर्हाईक का? त्यानंतर त्यांनी संतापून मागणी केली की, मोदी सोलापूरला येणार आहेत, त्यांच्याही बॅगांची तपासणी झाली पाहिजे, मला त्याचा व्हिडिओ पाठवा.
उध्दव ठाकरे तपासणीबाबत सतत तक्रार करीत असताना निवडणूक आयोगाने भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या बॅगा तपासल्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. औसा येथे हेलिकॉप्टरने प्रचारासाठी आलेले असताना हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी त्यांची बॅग तपासली.
उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल यवतमाळमधील वणी मतदारसंघाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी तिथे गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक कर्मचार्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केल्याने खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याबद्दल सरकारवर टीका केली होती. आज या घटनेची पुनरावृत्ती झाली. मविआचे औसा मतदारसंघाचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गेले होते. दुपारी त्यांचे हेलिकॉप्टर औसा येथे उतरण्यापूर्वीच निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलीस तिथे उपस्थित होते. ते उद्धव ठाकरेंकडील सामानाची झाडाझडती घेण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा उद्धव ठाकरेंनीही सामानाची तपासणी करणार्या अधिकार्यांचीच उलट चौकशी केली. त्यांचे नाव, नियुक्तीपत्रक, त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांना विचारले की, आतापर्यंत किती जणांना तपासले आहे? कर्मचार्यांनी, तुम्हीच पहिले आहात, असे उत्तर दिले. त्यावर दरवेळेला मीच पहिला गिर्हाईक आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. त्यावेळी त्यांनी मोदींच्या बॅगा तपासण्याचेही आव्हान या कर्मचार्यांना दिले. ते म्हणाले की, आज मोदी सोलापुरात येत आहेत. ओडिशात त्यांची बॅग तपासली म्हणून अधिकार्यांना सस्पेंड केले होते. त्यामुळे माझी तपासणी होत असेल तर मोदींचीही तपासणी झाली पाहिजे, ही माझी जाहीर सभेतील आजची मागणी आहे. या बॅगा तुमच्याकडेच ठेवा. हवे तर माझ्या पुढच्या मुक्कामी या बॅगा घेऊन जा. मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही घाबरू नका. लाजू नका. या बसा. बघा. पोलीसदादा तुमचाही फोटो काढतो. तुमच्या सगळ्यांची नावे टीव्हीवर येतील. तुम्हाला छान प्रसिद्धी मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी या कर्मचार्यांना सांगितले की, माझा तुमच्यावर राग नाही. परंतु हा जो एकतर्फी कारभार सुरू आहे, त्याला माझा विरोध आहे. मला जो कायदा लागतो, तो मोदींनाही लागला पाहिजे. कारण मोदीही प्रचाराला येत आहेत. त्यानंतर औसा येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मला सोलापुरात जायचे होते, पण त्यांनी माझे विमान थांबवले. कारण मोदींचे विमान येते आहे. तिकडचे रस्तेही बंद केले. म्हणजे तुम्ही मोदींच्या विमानासाठी सर्व एअरपोर्ट बंद करता. नागरिकांसाठी रस्ते बंद करता. मग हे टिकोजीराव येणार. ही लोकशाही असूच शकत नाही. माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी-शहांची बॅग तपासलीच पाहिजे. ते येतील तेव्हा तर त्यांची बॅग तपासाच, पण परत जातानाही त्यांची बॅग तपासा. कारण ते महाराष्ट्राला लुटून घेऊन चालले आहेत. ही सभा झाल्यावर उद्धव ठाकरे लोहारा येथे सभेसाठी हेलिकॉप्टरने पोहोचले, तेव्हा तिथेही निवडणूक आयोगाचे कर्मचारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. पत्रकारांनाही तिथून हटवण्यात आले होते. इथे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सामानाची तपासणी करण्यात येईल, असे सांगितले जात होते. परंतु उद्धव ठाकरे यांच्या सामानाची आज पुन्हा तपासणी करण्यात आली नाही.
माझीसुद्धा बॅग तपासली होती
अजित पवार यांचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी केली का, असा प्रश्न निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांना विचारला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज विरोधकांना उत्तर देताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्या बॅगेचीही तपासणी झाली.
मी परभणीला गेलो असताना माझ्या बॅगेचीही तपासणी झाली होती. लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा बॅग तपासली होती. बॅग तपासणीचा अधिकार्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी तक्रार करणे, आरोप करणे चुकीचे आहे. पोलिसांकडून हे होत असल्याचा आरोप विरोधक करत असतील तर आमच्यासोबत असणार्या पोलिसांच्यादेखील बॅगा तपासा, असे ते म्हणाले.