उदय सामंतांना विमानातून उतरवले परवानगी नसताना उड्डाणाचा हट्ट

अमरावती – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना अमरावतीच्या विमानतळावर वैमानिकाने उड्डाणाला नकार देत खाली उतरवले. परवानगी नसल्याने आपण उड्डाण करू शकत नाही असे वैमानिकाने सांगितले.
उद्योगमंत्र्यांचे सामानही खाली उतरवले. या प्रकरणी उदय सामंत यांनी विमान कंपनीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांना समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला जावे लागले. त्यानंतर वैमानिकाच्या विरोधात तक्रार करून विमान ताब्यात घेण्याचा आदेश दिला. पोलीस विमानतळावर गेले आणि त्यांनी विमान तिथेच उभे ठेवण्याची सक्ती केली. उदय सामंत यांची चूक असताना वैमानिक व विमान कंपनीला का त्रास दिला जात आहे? असा सवाल आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्योग भरारी या कार्यक्रमासाठी नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर होते. या दौर्‍यासाठी त्यांनी मुंबईतील एका खासगी विमान कंपनीचे विमान भाड्याने घेतले होते. अमरावतीचा कार्यक्रम आटोपून ते त्याच विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी बेलोरा या विमानतळावर आले. मात्र परवानगी नसल्याने वैमानिकाने उड्डाण करण्यास नकार दिला आणि उद्योगमंत्री विमानात बसत असतानाच वैमानिक गगन अरोरा यांनी त्यांचे सामान विमानातून बाहेर काढले. उदय सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही काही प्रतिसाद दिला नाही. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अखेर उदय सामंतांना समृद्धी मार्गावरून रस्तेमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचावे लागले. उदय सामंत यांनी विमान बुकच केले नव्हते. त्यामुळे वैमानिकाने त्यांना उतरवले, असे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी लोणी पोलिसांत तक्रार केली आहे. उदय सामंत यांच्या एसडीओंनी विमान जप्त करण्याचा आदेश दिल्याचे कळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top