उदगीरमध्ये दोन दिवसांत १५० कावळ्यांचा गूढ मृत्यू

लातूर- जिल्ह्यातील उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मागील दोन दिवसांपासून अनेक कावळे झाडांखाली गूढरित्या मृतावस्थेत पडलेले आढळून येत आहेत.दोन दिवसांत किमान १५० कावळे मृत झाले असल्याचे समोर आले आहे.

शहरातील या तीन ठिकाणी प्रशासनाला कावळे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. या कावळ्यांचे मृतदेह गोळा करण्यात आले आहेत. मंगळवारी व काल बुधवारी दिवसभर झाडाखाली हे कावळे मृतावस्थेत पडलेले दिसले.दोन्ही पायावर बसलेले कावळे सुरुवातीला पेंगतात, नंतर मान वाकडी होते आणि ते जमिन जमिनीवर कोसळतात. अशा पध्दतीने गेल्या दोन दिवसांत उदगीर शहरातील तीन ते चार ठिकाणी दीडशे कावळे मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तीन कावळ्यांवर उदगीरच्या पशू चिकित्सालयात उपचार करण्यात येत आहेत.

उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिलेल्या आदेशानंतर मृत कावळ्यांच्या रक्ताचे नमुने पुणे व भोपाळ येथील पशुरोग अन्वेषण विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.या मृत कावळ्यांचे मृतदेह गोळा केल्यानंतर उदगीर पालिकेच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यांना गाडण्यात आले आहे. हा बर्ड फ्लूसारखा प्रकार असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top