पुणे- राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडी हळूहळू वाढणार असल्याचे हे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात अद्याप थंडीची प्रतिक्षा आहे.
धुळे येथील कृषी महाविद्यालयात काल शनिवारी राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे.कोकणात उन्हाचा चटका अधिक असला तरी उर्वरित राज्यात कमाल तापमान हळूहळू कमी होत आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.मध्य महाराष्ट्रात पहाटेच्यावेळी गारठा वाढला आहे.राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत कायम आहे.राज्याच्या किमान तापमानात घट होत असली तरी थंडीची प्रतिक्षा कायम आहे.मध्य राज्यातील धुळ्यासह निफाड,नाशिक,जळगाव, अहिल्यानगर,महाबळेश्वर, पुणे येथे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आले आहे.